घातक-रसायन-विरहित जीवनशैली

Hello,

We have moved to the new site, check it out here http://www.jeevitnadi.org

Sorry for the inconvenience

 

पार्श्वभूमी

समस्या – नद्या नव्हे गटारगंगा

आपल्याला माहिती आहे का?
नदीतील ७०% पेक्षा जास्त प्रदूषणाचा वाटा घरातून जाणार्‍या सांडपाण्याचा आहे!

घरातून जाणारे सांडपाणी कशामुळे प्रदूषीत होते?
दैनंदिन घरगुती उत्पादनातील घातक रसायनांमुळे!
टूथपेस्ट, साबण, शैंपू, डिटरजंट, सौंदर्य प्रसाधने इ. सारख्या दैनंदिन घरगुती उत्पादनांमाध्ये Sodium Lauryl Sulfate, Triclosan, Sodium Fluoride, Cocamide diethanolamine, Monoethanolamine, Triethanolamine Isopropyl Alcohol, Carmoisine, Benzalkonium chloride इ. सारखी घातक रसायने तसेच वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी द्रव्ये आणि नाशके असतात.
ही घातक रसायने/ विषद्रव्य आपण रोज सांडपाण्यातून नाल्यांमध्ये आणि पर्यायाने नदीत व इतर जलस्त्र्तोतांमध्ये तसेच जमीनीत लोटत असतो. नदीचे पाणी निसर्गचक्रात सतत शुद्ध होत असते. पण मानव निर्मित अश्या या विषद्रव्यांचे नदीत शुद्धीकरण/विघटन होत नाही. ती कायमस्वरूपी नदीत राहातात.

एवढेच नाही, तर
या प्रदूषित पाण्याचा उपसा शेती साठी केला जातो. या पाण्यातील घातक रसायने पीकांमाध्ये शोषली जातात  आणि अशा प्रकारे ती अन्ज साखळीत प्रवेश करतात. याने सगळ्या जीव सृष्टीला हानी पोहोचते. हेच पीक धान्य, फळे आणि भाज्या आपण अन्नाद्वारे ग्रहण करतो.
या घातक रसायनांमुळे कँसर सारखे रोग, पोटाचे विकार, त्वचेचे विकार, श्वसनाचे विकार, वंध्यत्व इ. होऊ शकतात.

आणि म्हणून –    नदी स्वस्थ तर आपण स्वस्थ!

 

उपाय – जीवनशैलीत बदल

जर ७०% नदी प्रदूषण घरातील सांडपाण्यामुळे होते, तर याचाच अर्थ कमितकमी ७०% नदीप्रदूषण थांबवणे आपल्याच हातात आहे – आणि ते ही घरबसल्या!

गरज आहे ती आपल्या जीवनशैलीत हळूहळू बदल करण्याची!

यामागची एक साधी विचारसरणी
उगमापासून संगमापर्यंत नदी तिच्या मार्गाने वाहात असते, प्रवाहात जीवसृष्टी फुलवत जात असते. या संपूर्ण प्रवाहात तिचे पाणी शुद्ध ठेवण्याची निसर्गचक्रात एक उतकृष्ट आणि सुंदर अशी यंत्रणा आहे.
हा शुद्ध पाण्याचा प्रवाह आपण आपल्या घरांमधून फिरवतो आणि वापरुन परत नदीत सोडतो. पण मिळणारे हे पाणी जसे शुद्ध असते तसे घरातून जाणारे पाणी मात्र शुद्ध नसते. किंबहुना त्यातले काही घटक – मुख्तत्वे मानव निर्मित रसायने – नदीच्या शुद्धीकरणाच्या यंत्रणेत बसतच नाहीत.
मग यावर उपाय? जाणारे सांडपाणी नदीच्या शुद्धीकरणाच्या यंत्रणेत बसणारे सोडले तर?

हे कसं शक्य आहे?
जैवविघटनशील, विषद्रव्य-रहित पूर्वापार चालत असलेली घरगुती उत्पादने वापरुन! हाच तो जीवनशैलीतला बदल!
ही उत्पादने वापरुन आपली प्रकृती तर चांगली राहातेच – पर्यायाने नद्यांचे / पर्यावरणाचे पण आपोआप जतन होते!आणि आपल्या पूर्वजांनी नेमका हाच द्रुष्टीकोन ठेऊन, रीतसर संशोधन करुन, अशीच उत्पादने/गोष्टी वापरात आणलेली आहेत जी आपल्या पर्यावरणाला साजेशी, नैसर्गिक, स्थानिक आणि सहज उपलब्ध आहेत.

 

ही नेमकी कुठली उत्पादने आहेत? आणि ती कुठे मिळतील?
ही उत्पादने सगळ्यांच्याच परिचयाची आहेत, वापरलेली आहेत, काही अजून वापरात देखिल आहेत.
ती म्हणजे रिठा आणि शिकेकाई सारखी नैसर्गिक साबणं, किंवा दातांची निगा राखण्यासाठी दंतमंजन, किंवा आंघोळीचा नैसर्गिक साबण – उटणे इ.
यावर आधारित, जीवितनदीने एक ‘पर्यावरणपूरक घरगुती संच’ तयार केला आहे, ज्यात दातांची निगा राखायला, आंघोळीला, केस धुवायला, कपडे धुवायला, घर स्वच्छ ठेवायला वेगवेगळ्या उत्पादनांचा समावेश आहे. हा संच तयार करण्या मागचा उद्देश एवढाच, कि सांगितलेल्या गोष्टी आयत्या उपलब्ध असल्या कि त्यावर लगेच अम्मलवजावणी करायला शक्य होते.

या संचाविषयीची सविस्तर माहिती खालील भागात दिली आहे.
या संचात रोजच्या कौटुंबिक/घरगुती स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा समावेश आहे. आपण या संचाने सुरुवात करु शकता आणि नंतर त्या बाजारतून, किंवा संकेतस्थळावर दिलेल्या कृती वापरुन, घरी सुद्धा तयार करु शकता.
किंवा यातल्या कुठल्याही गोष्टी जीवितनदी कार्यकर्त्यांकडून अथवा ई-मेलनी संपर्क साधून विकत घेवू शकता.

बाजारातील अशी इतर उत्पादने वापरु शकता आणि आम्हाला त्या विषयी कळवू शकता. आम्ही संकेतस्थळावर टाकू, जेणेकरुन सगळ्यांनाच त्याचा फायदा लाभू शकेल.
किंवा घरीच प्रयोग करुन नैसर्गिक, जैवविघटनशील उत्पादने बनवून वापरु शकता जेणेकरुन स्वत:चे स्वास्थ्य तर शाबूत राहिलच शिवाय जलस्त्रोतही प्रदूशित होणार नाहित!

चला एक शाश्वत ‘विषद्रव्य-रहित जीवनशैली’ जगूया!

आपल्या नद्यांचे पुनरुज्जीवन करुन आपले पण स्वस्थ्य राखूया…!पर्यावरणपूरक घरगुती संच

जीवितनदीच्या या संचात दिल्या जाणार्‍या गोष्टी, त्या तयार करावयाची कृती आणि त्यांचा वापर, या बद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे. या संचात ८ गोष्टींचा समावश आहे.  त्या रोजच्या वैयक्तिक तसेच घरातील स्वच्छतेसाठी वापरता येतील.

या गोष्टी मिळण्याची ठिकाणे –

 • कुठल्याही काष्ठौषधीच्या दुकानात किंवा काही वाण्यांकडे
 • ऑनलाइन लिंक : https://goo.gl/Ph695w (Sustainable Living InstaDelight application).
 • जीवितनदी – लिविंग रिवर फौंडेशन स्वयंसेवकांकडून (दूरध्वनी क्रमांक शेवटी दिला आहे)
 • सस्टेनेबल लिविंग स्टोर (पत्ता व इतर तपशील शेवटी दिला आहे)
 • अग्रज फूड्स पाषाण (पत्ता व इतर तपशील शेवटी दिला आहे)
 • jeevitnadi.toxinfreelifestyle@gmail.com या mail id वर सविस्तर तपशील पाठवून

खाली दिलेल्या कृती प्रमाणे आपण सर्व गोष्टी घरच्या घरी पण तयार करू शकाल.

या संचात दैनंदिन स्वच्छतेसाठी लागणार्‍या खालील गोष्टींचा समावेश आहे

वैयक्तिक वापरासाठी

 

1.      दंतमंजन (Dental Care)

2.      उटणे (Body Wash)

3.      केस धुण्यासाठी शिकेकाई (Hair Wash)

 

   घरातील स्वच्छतेसाठी

4.    शिकेकाईची पूड

5.    रिठ्याची पूड

6.    खायचा सोडा

7.      व्हिनेगर- प्रकार १ (All Purpose Cleaner)

8.    व्हिनेगर- प्रकार २ (Toilet Cleaner)

वैयक्तिक वापरासाठीच्या गोष्टी

 1. दंतमंजन (Dental Care)
 • गुणधर्म – नैसर्गिक कषाय, तोंडाची दुर्गंधी दूर होते, हिरड्या बळकट आणि टणक होतात, दात किडत नाहीत
 • साहित्य
  • हिरडा (Terminalia chebula)
  • लवंग पूड (Syzigium aromaticum)
  • बकूळ साल (Mimusops elengi)
  • नीमसाल (Azadirachta indica)
  • बाभूळ साल (Acacia nilotica)
  • सैंधव (Rock salt)
 • कृती
  सर्व साहित्य खालील प्रमाणात घेउन एकत्र करा आणि चाळणीने चाळून घ्या

  • बकूळ पूड आणि नीमसाल प्रत्येकी १ भाग
  • हिरडा पूड, बाभूळ साल आणि सैंधव प्रत्येकी २ भाग
  • लवंग पूड १/२ भाग

   झाले दंतमंजन तयार!

   खबरदारी:  हवाबंद डब्यात भरून ठेवावे

 • वापरण्याची पद्धत
  एक चिमुट दंतमंजन हातावर घेऊन ओल्या टूथब्रशने किंवा बोटाने नेहेमी प्रमाणे दात घासावे.
  बोटाने हिरड्यांना मालिश केल्यास अधिक लाभ होतो. १०० ग्रॅम दंतमंजन ४ व्यक्तिंच्या कुटुंबाकरिता जवळ जवळ २-३ महिने पुरतं
  मुलांसाठी विको वज्रदंती, मेसवाक, डाबर रेड  इ. वापरू शकता.

टीप: १०० ग्रॅम दंतमंजन ४ व्यक्तिंच्या कुटुंबाकरिता जवळ जवळ १ महिना पुरते


 1. उटणे (Body Wash)
 • गुणधर्म जंतुनाशक, सुगंधित (दीर्घकाळासाठी), मृत त्वचा पडून निघते, थंडावा राहातो, त्वचा मुलायम आणि स्निग्ध राहाते
 • साहित्य
  • चंदन (Santalum album)
  • गव्हला कचोरा (Hedychium spicatum)
  • तुळस (Ocimum sanctum)
  • कचोरा (Curcuma zedoaria)
  • गुलाब पाकळ्या (Rosa centifolia)
  • संत्रा साल (Citrus sinensis)
  • मुलतानी माती (Fullers earth)
  • नागरमोथा (Cyperus rotundus)
  • बावची (Cullen corylifolium)
  • वाळा (Chrysopogon zizanioides)
  • आंबेहळद (Curcuma amada)
 • कृती
  सर्व साहित्य खालील प्रमाणात घेउन एकत्र करा आणि चाळणीने चाळून घ्या

  • चंदन, गव्हला कचोरा, तुळस, आणि कचोरा प्रत्येकी १ भाग
  • गुलाब पाकळ्या, संत्रा साल, मुलतानी माती, नागरमोथा, बावची, वाळा आणि आंबेहळद प्रत्येकी २ भाग

  झाले उटणे तयार!

  खबरदारी:  हवाबंद डब्यात भरून ठेवावे

 • वापरण्याची पद्धत
  1. साधारण किंवा थोड्या तेलकट त्वचेसाठी – १ मोठा चमचा उटणं आणि थोडं पाणी एकत्र कालवून त्वचेवर चोळा. किंवा त्वचेवर पाणी शिंपून त्वचा ओली करा. या ओल्या त्वचेवर उटणे लावून चांगले चोळा. २-३ मिनीटाने नेहेमीप्रमाणे आंघोळ करा.
  2. रुक्ष त्वचेसाठी – १ मोठा चमचा उटणं आणि थोडं दूध किंवा साय एकत्र कालवून त्वचेवर चोळा आणि २-३ मिनीटाने नेहेमीप्रमाणे आंघोळ करा.

टीप: १०० ग्रॅम उटणे ४ व्यक्तिंच्या कुटुंबाकरिता जवळ जवळ १ महिना पुरते


 1. केस धुण्यासाठी शिकेकाई (Hair Wash)
 • गुणधर्म केसांसाठी सौम्य, कोंडा होत नाही, केस गळत नाहीत, केस नैसर्गिक रित्या मुलायम होतात, नैसर्गिक पोत आणि स्निघ्धता टिकून राहाते, केस आरोग्यकारक राहातात, डोक्याच्या त्वचेला रोगसंक्रमण होत नाही (कवकरोधी)
 • साहित्य
  • शिकेकाई (Acacia concinna)
  • रिठा (Sapindus laurifolius)
  • मसाला –
   1. आवळ्याची पूड (Phyllanthus emblica)
   2. संत्रासाल पूड (Citrus sinensis)
   3. नागरमोथा (Cyperus rotundus
   4. बावची (Cullen corylifolium)
   5. कचोरा (Curcuma zedoaria)
   6. वाळा (Chrysopogon zizanioides)
 • कृती
  सर्व साहित्य खालील दिलेल्या प्रमाणात घेऊन, बारीक चाळणीने चाळून एकत्र करावे –

  • शिकेकाई १ किल
  • रिठा १०० ग्रॅम
  • मसाल्याचे घटक पदार्थ प्रत्येकी ४० ग्रॅम

  झाली केस धुण्यासाठी शिकेकाई तयार!

  खबरदारी: हवाबंद डब्यात भरून ठेवावे

 • वापरण्याची पद्धत
  1. साधारण किंवा थोड्या तेलकट केसांसाठी  – आंघोळीच्या तांब्यात किंवा तपेलीमध्ये थोडे गरम पाणी घ्या. त्यात 2 मोठे चमचे केस धुवायची शिकेकाई मिसळा. हे मिश्रण उकळून गाळून घेतल्यास अधिक लाभ होतो. या मिश्रणाने डोके चांगले मालिश करत चोळा आणि मग केस पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या. या शिकेकाईमुळे केसांचे आरोग्य आणि मुलायमता टिकून राहाते त्यामुळे वेगळे हेअर कंडिशनर वापरण्याची आवश्यकता नाही.
  2. रुक्ष केसांसाठी – या साठी 2 मोठे चमचे केस धुवायची शिकेकाई घ्या आणि वरील प्रमाणे केस धुवून घ्या.

  सावधान!
नहाताना डोळे घट्ट बंद करुन घ्या. समजा मिश्रण डोळ्यात गेले तर डोळे थोडा वेळ चुरचुरु शकतात, मग पाण्याने   डोळे धुवून घ्या. 

घरातील स्वच्छतेसाठीच्या गोष्टी

टीप: क्रमांक ४ ते ८ या गोष्टी स्वतंत्र पणे किंवा इतर घटकांबरोबर वापरु शकाल.

शिकेकाईची पूड, रिठ्याची पूड आणि व्हिनेगर वापरुन खाली दिलेल्या कृती प्रमाणे साबणाचे द्रावण (लिक्विड सोप) तयार करु शकता.
या साबणाच्या द्रावणाने कपडेच नव्हे तर स्वयंपाकघरातील ओटा, शेगडी, टेबल, नहाणीघराची भिंत आणि फरशा, काचेच्या खिडक्या वगैरे स्वछ करु शकता.

शिकेकाईची पूड, रिठ्यची पूड आणि खायचा सोडा वापरुन खाली दिलेल्या कृती प्रमाणे भांडी घासायचे निर्मलक तयार करु शकता. हे निर्मलक वापरल्यास तुलनेने भांडी घासायला कमी पाणी लागते.

२ चहाचे चमचे शिकेकाईची पूड, १ चहाचा चमचा रिठ्याची पूड, १ चहाचा चमचा लिंबू रस किंवा चिंचेचा कोळ, १ चहाचा चमचा मीठ हे सर्व एकत्र करून ओलसर मिश्रण तयार करा.  या मिश्रणाने तांबे, पितळेची भांडी धुवा.


 1. शिकेकाईची पूड
 • गुणधर्म सौम्य, नैसर्गिक साबण, पृष्ठक्रियाकारी, मृदुकारी, कवकरोधी, नैसर्गिक कषाय
 • वापरण्याची पद्धत

शिकेकाईची पूड आणि पाणी घेऊन ओलसर मिश्रण तयार करा. त्याचा उपयोग अंगाचा साबण म्हणून होऊ शकतो…
खबरदारी: हवाबंद डब्यात भरून ठेवावे


 1. रिठ्याची पूड
 • गुणधर्म  नैसर्गिक साबण, पृष्ठक्रियाकारी, प्रतीसूक्ष्म जैविक, शोथरोधी, कपड्यांपासुन दागिन्यांपर्यंत उत्तम स्वच्छता करते
 • वापरण्याची पद्धत
  रेशमी आणि नाजुक कपडे तसेच दागिने धुवायला उत्तम!

  खबरदारी:
  हवाबंद डब्यात भरून ठेवावे

 1. बेकिंग (खायचा) सोडा
 • गुणधर्म  यात स मु (pH) नियंत्रण करण्याचे तसेच उत्तम स्वच्छता करण्याचे गुणधर्म आहेत. शिवाय नैसर्गिक निर्गंधक, रोगनिवारक आणि अपघर्षक देखिल आहे.
 • वापरण्याची पद्धत
  किचन सिंक अथवा वॉश बेसिन वर बेकिंग सोडा भुरभुरुन घासणीने घासून धुवून घ्या.
  असे रोज केल्याने सिंक अथवा बेसिन तुंबत नाही. कारण बेकिंग सोडा घट्ट बसलेला मळ देखिल धुवून काढतो.खबरदारी: हवाबंद डब्यात भरून ठेवावे

 1. व्हिनेगर प्रकार १ – बहू-उद्देशीय निर्मलक (All Purpose Cleaner)
 • गुणधर्म  हे निर्मलक जंतुनाशक, नैसर्गिक निर्गंधक तसेच अँटी-ऑक्सिडंट (anti-oxidant) असून यामध्ये बुरशी, घातक जीवाणू आणि विषाणू यांच्या वाढीस प्रतिबंध करण्याचे गुणधर्म आहेत. याने कपडे मऊ रहातात, रंग पक्के होतात आणि डाग निघतात. शिवाय प्रदीर्घ काळासाठी टिकाऊ म्हणून लोणची इ. साठी याचा वापर होतोच (Food Preservative).
 • साहित्य
  1. असेटिक ऍसिड – ५०% केंद्रीभूत (कॉनसेंट्रेशनचे)
  2. बाष्पजल (Distilled water)
 • कृती
  १ लिटर बहू-उद्देशीय निर्मलक तयार करण्यासाठी १०० मि.लि. असेटिक ऍसिड आणि ९०० मि.लि. बाष्पजल एकत्र करा. कि बहू-उद्देशीय निर्मलक तयार!
 • वापरण्याची पद्धत
  अर्धी बादली पाण्यात एक झाकण बहू-उद्देशीय निर्मलक मिसळा. या मिश्रणाने तुम्ही घरातील फरशी, स्वयंपाकघरातील ओटा वगैरे साफ करु शकाल.
  या व्यतिरिक्त २ थेंब essential oil (citronella / lemon grass / mint) या पाण्यात मिसळले तर घरभर छान सुगंध तर पसरतोच शिवाय माश्या आणि इतर हानिकारक कीटक घरात येण्यास मज्जाव होतो.

टीप

  • बाजारात मिळणारे व्हाईट कुकिंग व्हिनेगर (white cooking vinegar) पण तुम्ही या साठी वापरु शकाल.
  • साफ केल्या नंतर उरलेले पाणी झाडांना घालू शकाल. त्याने झाडांना काही अपाय होणार नाही.

सावधान!:

  • संगमरवरी फरशीवर निर्मलक वापरु नये. असे केल्यास क्षरण होऊ शकतं अथवा पांढरे डाग पडू शकतात.
  • चुकून क्लीनर प्यायले गेले तरी काळजीचे कारण नाही, लगेच भरपूर पाणी प्या.

 

 1. व्हिनेगर प्रकार २ – स्वच्छतागृह निर्मलक (Toilet Cleaner)
 • गुणधर्म  हे निर्मलक जंतुनाशक, नैसर्गिक निर्गंधक तसेच अँटी-ऑक्सिडंट (anti-oxidant) असून यामध्ये बुरशी, घातक जीवाणू आणि विषाणू यांच्या वाढीस प्रतिबंध करण्याचे गुणधर्म आहेत. याने कपडे मऊ रहातात, रंग पक्के होतात आणि डाग निघतात. शिवाय प्रदीर्घ काळासाठी टिकाऊ म्हणून लोणची इ. साठी याचा वापर होतोच (Food Preservative).
 • साहित्य
  • असेटिक ऍसिड – ५०% केंद्रीभूत (कॉनसेंट्रेशनचे)
  • बाष्पजल (Distilled water)
 • कृती
  १ लिटर स्वच्छतागृह निर्मलक तयार करण्यासाठी २०० मि.लि. असेटिक ऍसिड आणि ८००मि.लि. बाष्पजल एकत्र करा. कि स्वच्छतागृह निर्मलक तयार!
 • वापरण्याची पद्धत
  1. वॉशबेसिन, नहाणीघराची भिंत आणि फरशा किंवा कमोड वर बेकिंग (खायचा) सोडा भुरभुरुन घासणीने घासून घ्या. अर्धी बादली पाण्यात एक झाकण स्वच्छतागृह निर्मलक मिसळून धुवून घ्या.
  2. २ चमचे बेकिंग (खायचा) सोडा आणि १/२ कप स्वच्छतागृह निर्मलक मिसळून घ्या आणि जो भाग स्वच्छ करायचा आहे त्यावर ओता. थोड्या वेळाने घासून धुवून घ्या. या मिश्रणाने नहाणीघराचे नळ शॉवर वगैरे ही (क्रोमियम प्लेटेड नसल्यास) साफ करु शकाल. बोअरचे डाग पण जातात. बेकिंग (खायचा) सोडा अपघर्षक असल्याने शॉवरची भोकं साफ होतात आणि पाण्याचा ओघ चांगला राहातो.

सावधान!:

  • संगमरवरी फरशीवर क्लीनर वापरु नये. असे केल्यास क्षरण होऊ शकतं अथवा पांढरे डाग पडू शकतात.
  • चुकुन क्लीनर प्यायले गेले तरी काळजीचे कारण नाही, लगेच भरपूर पाणी प्या.


 

साबणाचा द्रव (Liquid soap) आणि भांडी घासायची पूड

साबणाचा द्रव (Liquid soap)

 • साहित्य –
  1. रिठा पूड / अख्खे रिठे
  2. शिकेकाई पूड
  3. व्हिनेगर प्रकार १ – बहू-उद्देशीय निर्मलक (All Purpose Cleaner)
 • कृती
  1. रिठ्याची पूड वापरुन –
   १ लिटर पाणी, २ मोठे चमचे रिठ्याची पूड आणि १ मोठा चमचा शिकेकाई पूड घेऊन सर्व एकत्र करा. हे मिश्रण ढवळत, चांगले उकळून घ्या. थंड झाल्यावर गाळून घ्या.
   देर्घकाळ टिकावं (जवळ जवळ २ महिने) म्हणून १ कप व्हिनेगर पण घाला. उरलेल्या गाळापासून परत याच पध्दतीने सौम्य साबण तयार होतो. या साबणाने तुम्ही स्वयंपाकघरातील ओटा, चिकट झालेली शेगडी, सिंक, ओशट भांडी, काचेच्या खिडक्या वगैरे स्वच्छ करु शकता.
  2. अख्खे रिठे वापरुन
   मध्यम आकाराचे ६ अख्खे रिठे रात्री पाण्यात भिजत घाला.
   सकाळी हे रिठे (थोडे ठेचून), १ मोठा चमचा शिकेकाई पूड आणि १ लिटर पाणी घेऊन सर्व एकत्र करा. हे पाणी चांगले उकळून घ्या. थंड झाल्यावर मिश्रण गाळून घ्या. चांगलं टिकावं (जवळ जवळ २ महिने) म्हणून १ कप व्हिनेगर घाला. उरलेल्या गाळापासून परत सौम्य साबणाचा द्रव तयार होतो. या साबणाने तुम्ही चिकट झालेली शेगडी, ओशट भांडी, स्वयंपाकघरातील ओटा, सिंक, काचेच्या खिडक्या वगैरे स्वच्छ करु शकता.
   साबणाचा हा द्रव एकदम २-३ लि. करुन ठेवला तरी जवळ जवळ २ महिने टिकतो.
 • वापरण्याची पद्धत
  1. हाताने कपडे धुण्याची कृती  –
   ७५/१०० मि.लि. वरील साबणाचा द्रव घऊन बादलीभर पाण्यात मिसळून कपडे भिजवून ठेवा आणि नेहमी प्रमाणे कपडे धुवा.
  2. वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुण्याची कृती  –
   1. पुरचुंडी मध्ये रिठा पूड इ. वापरुन
    एका सूती हातरुमाल किंवा मोज्यामध्ये 2 चहाचे चमचे शिकेकाई पूड आणि २ चहाचे चमचे रिठा पूड घेऊन त्याची पुरचुंडी बांधा. ही पुरचुंडी वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांबरोबर ठेवा. तसेच १ कप व्हिनेगर वॉशिंग मशीनच्या softener dispenser मध्ये टाका. नंतर नेहमी प्रमाणे मशीनमध्ये कपडे धुवा.
   2. पुरचुंडी मध्ये अख्खे रिठे इ. वापरुन –
    मध्यम आकाराचे ६ अख्खे रिठे पाण्यात २ तास भिजवा. नंतर हे रिठे थोडे ठेचून घ्या आणि २ चहाचे चमचे शिकेकाई पूड बरोबर एका सूती हातरुमाल किंवा मोज्यामध्ये घेऊन त्याची पुरचुंडी बांधा. ही पुरचुंडी वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांबरोबर ठेवा. तसेच १ कप व्हिनेगर वॉशिंग मशीनच्या softener dispenser मध्ये टाका. नंतर नेहमी प्रमाणे मशीनमध्ये कपडे धुवा.
    हेच रिठे २-३ वेळा वापरता येतात. मात्र दर वेळेला चहाचे २ चमचे शिकेकाई पूड वेगळी घ्यावी.
   3. साबणाचा द्रव वापरुन –
    ७५/१०० मि.लि. वरील साबणाचा द्रव मशीनच्या detergent dispenser मध्ये टाका. तसेच १ कप व्हिनेगर वॉशिंग मशीनच्या softener dispenser मध्ये टाका. नंतर नेहमी प्रमाणे मशीन चालवून कपडे धुवा.

भांडी घासायची पूड

 • साहित्य
  1. रिठा पूड
  2. शिकेकाई पूड
  3. बेकिंग (खायचा) सोडा
 • कृती
  चहाचे २ चमचे शिकेकाई पूड, चहाचे २ चमचे रिठा पूड आणि चहाचा १ चमचा बेकिंग (खायचा) सोडा एकत्र करून चांगले मिसळा. झाली भांडी घासायची पूड तयार!
  यात लिंबू किंवा संत्रासाल पूड पण घालू शकता. शिवाय ओशट भांडी घासायला आवळा पूड आणि मीठ घालू शकता. तसेच थोडे व्हिनेगर पण घालू शकता.

  या मिश्रणामुळे भांडी घासताना तुलनेने पाणी कमी लागते.टीप :

 • उटणे आणि बेकिंग (खायचा) सोडा रिकाम्या मीठ-मिरपूडच्या शेकर (shaker) मध्ये किंवा फेसपावडरच्या डब्यांमाध्ये मध्ये भरुन वापरु शकता.
 • रिकाम्या हॅंडवॉश डिस्पेंसर (hand wash dispenser) मध्ये व्हिनेगरचे दोन्ही निर्मलक किंवा साबणाचे द्रव भरुन वापरु शकता.
 • घरातील स्वच्छतेसाठी लिंबू साल, संत्रा साल, मीठ इ. सारख्या पारंपारिक किंवा आजीच्या बटव्यातील इतर गोष्टी पण वापरु शकता. किंवा अशा इतर सर्व जैवविघटनशील गोष्टी वापरु शकता.

संचातील सर्व गोष्टी हवाबंद डब्यामध्ये भरुन ठेवाव्या.

 

या संचातील सर्व गोष्टी नैसर्गिक, जैवविघटनशील आणि विषद्रव्य-रहित आहेत.

 

मागणी नोंदविण्यासाठी –

 1. jeevitnadi.toxinfreelifestyle@gmail.com वर मेल पाठवू शकता
 2. ऑनलाइन लिंक : https://goo.gl/Ph695w (Sustainable Living InstaDelight application).
 3. जीवितनदी लिविंग रिवर फौंडेशन स्वयंसेवक – ९०४९६५२९२२
  वेळ – ११ ते ६ च्या दर्म्यान
 4. सस्टेनेबल लिविंग स्टोर – ७७२००८७७९९
  वेळ – सकाळी १० ते रात्री ८
  पत्ता – माधवबाग क्लिनिक, प्लाॅट नं ३४, शिवगाायत्री, कुलश्री सोसायटी लेन नं २,
  साई विहार फेज २ सोसायटी, कर्वेनगर, कोथरुड, पुणे
 5. अग्रज फूड प्रॉडक्टस, देसाई एंटरप्राइझेस – ९८८१८९०९२१
  वेळ – सकाळी १० ते १.३० व सायंकाळी ५ ते ९
  पत्ता – कुमार सहवास, दुकान नं ६ व ७, नवीन बाणेर-पाषाण लिंक रोड, पाषाण