मनोगत एका आईचं……

मनोगत एका आईचं……

माझ्या प्रिय पुणेकर लेकरांनो,

तुम्ही म्हणाल कि पुणेकरांना लेकरे वगैरे म्हणणारी हि कोण? तर मी आहे पुणेरी संस्कृतीची जन्मदात्री – मुठा नदी. आता हे जरा अतीच होतंय असही तुम्हाला वाटणं साहजिकच आहे. ज्यांनी पुणेरी संस्कृतीची बीजं पेरली ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी तिची कीर्ती अटकेपार पोहोचवली ते पेशवे, ज्यांनी या संस्कृतीला समाज सुधारणेचे अलंकार चढवले ते लोकमान्य टिळक, आगरकर, गोखले, महात्मा फुले, महर्षी कर्वे, सावित्रीबाई फुले इत्यादी महान व्यक्तीच या पुणेरी संस्कृतीवर आपला हक्क सांगू शकतात. तुमच मत १००% खरं आहे आणि खुद्द मला स्वतःलासुद्धा या सर्वांबद्दल तुमच्या एवढाच अभिमान आहे.

पण माझं आणि तुमचं नातं हे थोडं वेगळं आहे. मी तुम्हाला त्या आधी आपल्या संपूर्ण परिवाराची थोडक्यात ओळख करून देते.

मी या परिवाराची मूळ स्त्री आहे आणि माझ्या आजूबाजूला पसरलेला हा डोंगर-दऱ्या-पटांगणं असलेला प्रदेश हा या परिवाराचा मूळ पुरुष आहे. आमच्या पवित्र मिलनातूनच वृक्षवल्ली, पशुपक्षी, कीटक, सूक्ष्मजीव, मासे या सर्व प्रकारच्या संततींचा जन्म झाला. या परिवारातच पुढे तुमच्यासारख्या बुद्धिमान मानवांनी जन्म घेतला. खरच तुमच्या येण्यानी हा परिवार खऱ्या अर्थानी परिपूर्ण झाला.

कोणत्याही कुटुंबात जसे हुशार आणि कर्तृत्ववान मुलाचं कौतुक होत, लाड पुरवले जातात, तसेच आम्ही सर्वांनी तुमचे सर्व प्रकारचे लाड आजपर्यंत भरपूर पुरवले आणि आजही पुरवतच आहोत. आपला परिवार अत्यंत समंजस आहे. दुसऱ्याला एखादी नवी गोष्ट आणली कि मलाही पाहिजे असले क्षुद्र हट्ट कोणीही करत नाहीत. आपापली नेमून दिलेली कामे चोख करतात.

आता बहुधा तुम्हाला माझी थोडीशी का होईना ओळख पटली असेल. आणि मी स्वतःला का पुणेरी संस्कृतीची जन्मदात्री म्हणवून घेते तेही उमगल असेल.

आज हजारो वर्षांनी मी तुमच्याशी संवाद साधायला आले आहे. त्याला कारणही तेवढंच गंभीर आहे.

मी जशी एक माता आहे तशीच या कुटुंबाची कुशल गृहिणीसुद्धा आहे. त्यामुळेच या कुटुंबाच्या भविष्यातील धोके मला सर्वात आधी जाणवतात. आज आपलं हे कुटुंब अत्यंत गंभीर परिस्थितीत आहे. आणि अशाच गोष्टी पुढे चालू राहिल्या तर आपल्या या समृद्ध कुटुंबाचा सर्वनाश अटळ आहे. मला खंत याच गोष्टीची आहे कि माझ्या सर्वात बुद्धिमान आणि कर्तबगार मुलांना याची काहीच कल्पना कशी काय नाही?

याही पुढचं दुर्दैव हेच आहे कि या परिस्थितीला तुमचीच बेजबाबदार वर्तणूक कारणीभूत आहे.

पुण्याचा परिसर हे आपलं घर आहे. या घराला नीटनेटके पणे व्यवस्थितपणे ठेवण्याचं काम मी अनेक वर्षं करतेच आहे, आजही करते आहे. आपला परिवार वाढला, पाहुणे वाढले तरीही माझ्या अफाट शक्तीमुळे मी हे काम अगदी ४०-५० वर्षापूर्वी पर्यंत विनासायास करताच होते.

पण माझ्या शक्तीलाही काही मर्यादा आहेत. तुम्ही धरणे बांधून माझा या घरातला वावर मर्यादित करून टाकलात. पूर्वी तुम्ही जबाबदारीने वागयचा आणि माझा त्रास कमी कसा होईल हे बघायाचात. तेव्हा आपला नात अत्यंत जिव्हाळ्याच होत.

पण तुम्ही मोठे झालात, उच्चशिक्षित झालात आणि हे हळू हळू बदलायला लागलं. आर्थिक विकास, उच्च तंत्रज्ञान, उच्च राहणीमान अशा गोंडस नावांखाली अनेक अनिष्ट गोष्टी आपल्या घरात आल्या. आणि तुम्हाला काही प्राथमिक पण महत्वाच्या गोष्टींचा वेगाने विसर पडायला लागला.

अनिर्बध पणे माझ्या प्रवाहात सोडला जाणारा मैला, कचरा, प्लास्टिक, विषारी रसायने, कारखान्यांचे आणि तुमच्या घरांमधले सांडपाणी या सगळ्यामुळे आज माझं स्वरूप एका मृतप्राय गटारात झालं आहे. पण याबाबत तुम्हाला कोणतीही खंत दिसून येत नाही. तुमच्या अत्यंत व्यस्त आणि महत्वाच्या गोष्टींमधून थोडा वेळ काढून कधीतरी मला भेटायला या. माझी परिस्थिती बघून तुम्हालाच तुमची लाज वाटल्याशिवाय राहणार नाही.

हे मी फक्त माझ्या वेदनांच रडगाणं तुम्हाला ऐकवत नाहीये. अजूनही तुम्हाला हे समजत नाहीये कि माझं मरण हे तुमच्यासकट आपल्या सर्व परिवाराच मरण आहे. या धोक्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मृत झालेल्या प्राचीन संस्कृतींचे अवशेष या पृथ्वीवर तुम्हाला अनेक ठिकाणी आजही बघायला मिळतील.

या मधून शिकण्यासाठी लागणारी बुद्धि तुमच्याकडे भरपूर आहे. तसच त्यावर कृती करण्याची ताकदही तुमच्याकडे आहे. कमी पडती आहे ती थोडी संवेदनशीलता आणि इच्छाशक्ती.

परंतु संपूर्ण भारतवर्षात सर्वात सुशिक्षित, सर्वात सुसंस्कृत आणि सर्वात सुजाण नागरीक असल्याचे बिरुद मिरवणारी माझी मुलं यावर नक्की कृती करतील अशी मला मात्र भरपूर आशा आहे.

सर्वशक्तिमान ईश्वर तुम्हाला सद्बुद्धी देवो!!

सर्वांना प्रेमळ आशीर्वाद!!

तुमची जीवनदायिनी,

 

मुठा नदी…

  मनीष घोरपडे

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s